.post img {

Automatic Size

Friday 29 March 2024

कणादच्या बाबाची डायरी (२)

१२ मार्च)

आज पहिल्यांदाच तुझे केस कापले. म्हणजे जावळ काढले होते तेव्हा तुला इतकं काही कळत नव्हतं. आणि नाव्ही काकांनी पटकन मशीन ने कापले होते त्यामुळे रडला नव्हतास.

आज तिथे सलोनमध्ये पाय ठेवल्या ठेवल्या दवाखान्यात पाऊल ठेवल्यासारखे तुझ्या चेहऱ्यावर डिफेनसिव्ह भाव आले. आणि जसे त्यांनी कात्री काढली तसा तू भोंगा पसरलास. मग तुझं डोकं दाबून धरून 10 मिनिटात कसेबसे केस कापले बाबा. तू खूप रडलास आणि प्रत्येक सेकंद माझ्यासाठी खूप अवघड होता.

पण पहिल्या वाहिल्या हेअरकट नंतर हिरो दिसतोयस आता. 


२९ मार्च)
मी कामानिमित्त भरुच (गुजरात) मध्ये आलोय. तुझी खूप आठवण येतेय. विशेषतः तुला जवळ घेऊन मिठी मारण्याची.

पण मी नसल्यावर मल तू मिस करत नाहीस (अजूनतरी).म्हणजे घरी मी जवळ असतो तेव्हा माझ्या मागे लागतोस पण मी बाहेरगावी असल्यावरही तू ओके असतोस. पण बापाची किती वेडी आशा असते बघ ना! असं वाटतं की मी असा बाहेर असताना, तू फोनवर म्हणशील... बाबा कधी येतोयस परत? आठवण येतेय तुझी...


३० मार्च)
आज मी घरी परत आलो. कधी एकदा तुला मिठीत घेतो असं झालेलं. मग आईने दार उघडलं आणि मला पाहिले तसा तू पळतच आलास. पायाला मिठी मारून पायालाच पप्पी दिलीस. आणि उचलून घेतल्यावर मग खूष झालास. त्यानंतर मग खांद्यालाही पप्पी दिलीस. अरे तुला चॉकलेट मिळाल्यावर किती खूष होतोस की नाही तेवढाच मी खूष झालेलो त्यावेळी...❤️

४ एप्रिल)
माझं wallet खेळायला घेतोस ना तेव्हा त्यातल्या नोट्स आणि कार्ड्स माझ्याकडे एकेक करून आणून देतोस. मी मग आनंदात हात नाचवत म्हणतो, "अरे वाह.. अरे वाह..मला दिलं... मला दिलं.. कणादने मला दिलं..." आणि हे तुला खूप आवडले. म्हणजे तुला वाटलं की मी काहीतरी छान गोष्ट बाबाला देतोय आणि बाबाला ते खूप आवडले. मग आता मला तू काहीही दिलंस तर मला तूच हात नाचवून तसं म्हणायला सांगतोस. आणि मी तसं केलं की मग खूष होतोस.

६ एप्रिल) 
माझं लक्ष नसेल आणीबतुला जर मला बोलवायचं असेल तर मग तू "अद्दा.. अद्दा... " अशी हाक मारून बोलावतोस. ही मला तू मारलेली पहिली हाक. आता बाबा म्हणशील तेव्हा।म्हणशील.